कोल्हापूर : गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाला प्रति टन 400 रुपये जादा दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवर पायी जाणार आहे. 22 दिवस हे आंदोलन सुरू असेल, असेही शेट्टी यांनी जाहीर केले.
राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान साखर कारखान्यांवर पायी 522 किलोमीटर चालून आत्मक्लेश करण्यात येईल. शेट्टी यांनी 3 ऑक्टोबर 2023 पासून साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. 17 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील साखर कारखान्यांनाही तोच नियम लावणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 10 ऑक्टोबर रोजी कर्नाटकमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी आणि कर्नाटक रयत संघाचे आंदोलन होणार असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली. 2 ऑक्टोबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रत्येक कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद साखर कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून 400 रूपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.