कोल्हापूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील घोडावत जॉगरी कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली होती. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. जोपर्यंत उसाचा हप्ता मिळत नाही, तोपर्यंत हंगाम सुरू करायचा नाही, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रूपयेच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे.
४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. कारखानदारांनी अद्याप मागणी न मान्य केल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील उर्वरित 400 रुपये द्यावेत, या मागणीसाठी आत्मक्लेश पदयात्रा सुरू आहे. या माध्यमातून शेट्टी यांनी कारखानदार आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे. देशातील सर्वात जास्त महसूल देणाऱ्या साखर उद्योगाकडे कारखानदार व सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.