गुळाला गोडवा : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून गुळाला चांगली मागणी, दरात ४०० रुपयांची वाढ

कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यात गुजरातमधून गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. येथे आवक होणाऱ्या गुळास क्विंटलला ३६०० ते ४६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हंगामाच्या प्रारंभी गुळाचे दर जास्तीत जास्त ४००० ते क्वचित प्रसंगी ४२०० रुपयांपर्यंत स्थिर होते. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत गुळाची आवकही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. संक्रांतीच्या काळात गुळाला मोठी मागणी असल्याने गुळाची ही तेजी आणखी पंधरा दिवस तरी कायम राहील अशी चिन्हे आहेत. यंदाही गुऱ्हाळे जास्त गतीने सुरू झाली नसल्याने गुळाची आवक जेमतेम होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा कर्नाटकातील गुऱ्हाळेही कमी प्रमाणात सुरू झाली. हंगामाच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात गूळ उपलब्ध होईल असा अंदाज व्यापाऱ्यांचा होता. पण कर्नाटकातूनही जेवढी आवक व्हायला हवी तेवढी आवक सध्या होत नसल्याने व्यापाऱ्यांनी कोल्हापूरचा गूळ खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या गूळ बाजारात गुळाची दररोज १३००० ते १५००० रव्यांची आवक होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुजरातमध्ये थंडी चांगली आहे. गुजरातमध्ये थंडीच्या कालावधीत गुळाचा वापर नागरिकांकडून वाढत असल्याने या कालावधीत मागणी होत असते. यामुळे तेथील व्यापाऱ्यांनीही गेल्या पंधरवड्यापासून गुळाच्या खरेदीत जादा उत्साह दाखविण्यास सुरुवात केली, याचा परिणाम दरावर झाला आहे. पंधरवड्याच्या तुलनेत सध्या ३०० ते ४०० रुपयांनी गुळाच्या दरात वाढ झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. संक्रांतीच्या वेळीही गुळाला चांगली मागणी असते. गुळापासून विविध पदार्थ तयार करण्यासाठी संक्रांतीच्या अगोदर किमान आठवडाभर तरी गूळ बाजारपेठेत जाणे अपेक्षित असते. संक्रांतीसाठी गूळ वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी अनेक व्यापारी गुळाची खरेदी करत आहेत.

भरारी पथकाकडून बनावटगीरी करणाऱ्या गुळ व्यापाऱ्याला दंड

बाजार समितीच्या मार्केटमधील एक व्यापारी गुजरातमधील प्रसिद्ध बडेचा ब्रँडचा छाप मारून बनावटगीरी करत गुळाची गुजरातला विक्री करत होता. याबाबत गूळ विभागातील भरारी पथकाला याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून दोन दिवसांपूर्वी हा ट्रक पडकला. भरारी पथकाने कारवाई करत हा ३ टन गुळ जप्त केला आणि पथकाने सर्व चौकशी करून संबंधित व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असा जबाब व्यापाऱ्याकडून लिहून घेण्यात आला आहे.

व्यापारी अरविंदलाल पूनमचंद शहा याच्याकडून असा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला. भरारी पथकाने पकडलेल्या ट्रकमध्ये गुळाचे १७५ बॉक्स होते. बॉक्सवर बडेचा असे छाप मारले होते. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यास जाब विचारला. त्याने हा छाप विकत घेतल्याचे सांगितले. मात्र, त्याची कागदपत्रे गुजरातमध्ये असल्याचे सांगितले. मात्र ती कादगपत्रे आणण्यास दोन दिवसांची मुदत देऊनही तो व्यापारी त्या ब्रँडची कागदपत्रे देऊ शकला नाही. यावर समितीने संबंधित व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. सभापती प्रकाश देसाई, सचिव जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गूळ विभागप्रमुख व उपसचिव अनिल पाटील, वरिष्ठ अधिकारी महेश लाड, कर्मचारी त्रिलोकसिंह बावचे यांनी ही कारवाई केली. याबाबत सभापती प्रकाश देसाई म्हणाले की, ज्या व्यापाऱ्याने दुसऱ्याचा ब्रँड वापरून गुजरातला गुळ पाठविण्याचा प्रकार केला, तो अत्यंत चुकीचा आहे. असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here