फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टींग करण्याची तयारी करत आहे. कंपनीने शेअर बाजारात प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. काही महिन्यांपासून स्विगीने कमकुवत बाजारामुळे ही प्रक्रिया रोखून धरली होती. आता कंपनीने मूल्यांकन करण्यासाठी बँकर्सशी बोलणी सुरू केली आहेत. रेस्टॉरंट्समधून अन्न वितरणाव्यतिरिक्त, घरोघरी किराणा उत्पादने वितरीत करणार्या स्विगीचे मूल्यांकन २०२२ मध्ये शेवटच्या निधी उभारणीदरम्यान १०.७ अब्ज डॉलर निश्चित करण्यात आले होते.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्यावर्षी निधी आणि मूल्यांकनाच्या अभावामुळे स्विगीने आपली आयपीओ योजना थांबवली होती. आता जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत तेजी आल्याने, स्विगीने सप्टेंबरच्या सुरुवातीला आठ गुंतवणूक बँकांना आयपीओवर काम करण्यासाठी आमंत्रित करून पुन्हा आपल्या योजनेला गती दिली आहे, असे रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये मॉर्गन स्टॅनली, जेपी मॉर्गन आणि बँक ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे.
स्विगीने सुरुवातीला आयपीओच्या माध्यमातून ८०० मिलियन डॉलर ते एक बिलियन डॉलर उभारणीचा विचार केला होता. २०२२ च्या सुरुवातीला यावर काम सुरू करण्यात आले. जुलै ते सप्टेंबर २०२४ यादरम्यान लिस्टिंगचे स्विगीचे प्रयत्न आहेत. स्विगीचे प्रतिस्पर्धी झोमॅटोच्या शेअरमध्ये आतापर्यंत ५४.८ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने अद्याप संभाव्य हिस्सा विक्री अथवा अंतिम व्हॅल्यूएशनचा निर्णय घेतलेला नाही.