कामगारांचा पीएफ थकवल्याप्रकरणी ‘गोडसाखर’वर कारवाई करा : कामगार संघाची मागणी

कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने (गोडसाखर) २०१३ पासून कामगारांचा १६ कोटी २२ लाख १२ हजार ९१३ रुपये प्रॉव्हिडंट फंड थकवला आहे. त्याची वसुली तातडीने करावी अशी मागणी ‘गोडसाखर’ साखर कामगार संघाने केली आहे. याबाबत प्रॉव्हिडंड फंड कार्यालयाला निवेदन देण्यात आले. कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले दिली आहेत. त्यानंतर सध्या कारखान्याकडे १ लाख ७० हजार क्विंटल साखर साठा आहे. ही साखर विक्री करून त्याचे पैसे प्रॉव्हिडंड फंडामध्ये भरावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

कामगार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याने २०१३ ते २०२१ अखेर ८,७६,३२,३७४ रुपये पीएफ थकवला आहे. १० एप्रिल २०२१ ते नोव्हेंबर २०२२ अखेरची रक्कम ५,५१,९०,२३० रुपये पीएफ व व्याज देय आहे. डिसेंबर २०२२ ते जून २०२३ अखेर १९,३९,३०९ रुपये पीएफ व व्याज थकीत असून ही एकत्रित रक्कम १६ कोटी रुपये होते. याबाबत कारखान्याशी पत्र व्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले आहे, संघाचे जनरल सेक्रेटरी अशोक मेंडुले, अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, अरुण शेरेगार, सुरेश कब्बुरी, सुनील आरबोळे आदींनी हे निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here