कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेतली. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस वाहतूकदारांची ऊस तोडणी मजूर मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. यात २०२१ पासून वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूकदारांवर कारखाना प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र गुन्हे दाखल असणारे ऊस तोडणी मजूर मुकादम मोकळे अन् मोकाट फिरत आहेत. ज्या मुकादमांविरोधात वाहतूकदारांनी फिर्याद दिली आहे, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ऊसतोड मजूर आणि टोळी मुकादमांकडून तब्बल २०२१-२०२२ आणि २०२२ ते २०२३ या गळीत हंगात ४८६ कोटींची फसवणूक झाली आहे. तर ही रक्कम कारखान्यांच्या हमीपत्रानुसार आहे. पण टोळी करताना १० ते १५ लाख रूपये मोजावे लागतात. याप्रमाणे २ वर्षात किमान १ हजार कोटींच्यावर फसवणूक झाल्याचा दावा स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ११५० गुन्ह्यांची नोंद झाली. तर ४४५ गुन्हे न्यायालयात दाखल झाले. याचबरोबर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्या आहेत. मात्र यावर कोणतीच कारवाई सुरू नसल्याचे समोर आले आहे. याबाबतच शेट्टी यांनी जिल्हा पोलिसप्रमुख पंडित यांची भेट घेतली. यावेळी संदीप राजोबा, प्रविण शेट्टी, रावसो अबदान, विठ्ठल पाटील, विनोद पाटील, अनिल हळदणकर, चव्हाण बापू, दादा पाटील, प्रकाश पोवार, तानाजी पाटील, दत्ता बाबर, दत्ता पेडणेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.