नमक्कल : अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुरुवारी जेदारपलयम जवळील ४५ गुऱ्हाळघरांमधून १० टन साखर जप्त केली. जिल्ह्यातील परमथी वेल्लोरजवळील पिलिक्कलपलयम आणि जेदारपलयम या भागात ६० हून अधिक गुऱ्हाळघरे कार्यरत आहेत. पोंगल सण जवळ आल्यामुळे ‘अचू वेल्लम’ आणि ‘उरुंडाई वेल्लम’चे उत्पादन जोरात सुरू आहे.
काही गुऱ्हाळघरांकडून गुळ उत्पादनात साखरेचा वापर करीत असल्याची माहिती मिळाल्यावर, जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. अरुण यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी शोध मोहीम राबवली. मोहिमेदरम्यान, पथकाने ४५ गूळ उत्पादन युनिटमधून १० हजार ९०० किलो साखर जप्त केली. त्यांनी प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी गुळाचे नमुनेदेखील घेतले आहेत. जर चाचणी अहवालात भेसळ असल्याचे सिद्ध झाले तर दोषी युनिट्सवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर दंडही आकारला जाईल. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुळात साखर मिसळणाऱ्या गुळ युनिट मालकांवर कडक कारवाई आणि मोठा दंड आकारण्याचा इशारा दिला आहे.