केंद्रीय भांडारातून दरमहा १०,००० मेट्रिक टन गहू आणि तूर डाळीचे वितरण मंजूर करावे अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी, १२ जुलै रोजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी या वस्तू सहकारी दुकानांच्या माध्यमातून विक्री करण्याची गरज आहे, असे स्टॅलिन यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
याबाबत द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांना देशांतर्गत उत्पादनातील कमतरता लक्षात घएता या उत्पादनांच्या आयातीसाठी केंद्र सरकारकडून गतीने प्रयत्न केले जावेत अशी विनंतीही केली आहे. अन्नधान्यातील महागाईत दिसून आलेली वाढ आणि चिंताजनक स्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ग्राहकांवरील याचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्य सरकारांच्या मदतीसाठी तत्काळ पावले उचलली जावीत अशी मागणी केली आहे.