चेन्नई : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री एमआरके पन्नीरसेल्वम यांनी विधानसभेत उसाचा दर प्रती टन ४,००० रुपये करण्याचा पुनरुच्चार केला. त्यांच्या या घोषणेमुळे द्रमुकने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार आहे. अण्णा द्रमुकचे आमदार सी. विजय भास्कर यांनी सरकारवर भातासाठी प्रति क्विंटल २,५०० रुपये आणि उसासाठी प्रति टन ४,००० रुपये एमएसपी लागू न केल्याबद्दल टीका केली होती. त्यांना उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिल्याचे द न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना मंत्री पन्नीरसेल्वम म्हणाले, “ऊसाच्या बाबतीत, आम्ही आमचे निश्चित केलेले लक्ष्य साध्य करू. आम्ही मागील सरकारपेक्षा प्रति मेट्रिक टन सुमारे ४०० रुपये जास्त देत आहोत, तर सध्याचा भाव सुमारे ३,५०० रुपये आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की येत्या वर्षात आम्ही ते प्रति मेट्रिक टन ४,००० रुपये पर्यंत वाढवू.” त्यांनी अधोरेखित केले की मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आधीच भात आणि ऊस दोन्हीसाठी किमान आधारभूत किंमत वाढवली आहे, जे आर्थिक अडचणी असूनही शेतकऱ्यांप्रती सरकारची वचनबद्धता दर्शवते. अण्णाद्रमुक सरकारशी तुलना करताना, पन्नीरसेल्वम म्हणाले की, पूर्वी शेतकऱ्यांना ऊस बिले मिळण्यामध्ये विलंब सहन करावा लागत असे. ते म्हणाले की, आधीच्या सरकारपेक्षा हे सरकार वेगळे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची बिले वेळेवर मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.