धर्मपुरी : पलाकोडे येथील धर्मपुरी जिल्हा सहकारी साखर कारखाना लिमिटेडमध्ये चालू आर्थिक वर्षात सोमवारपासून ऊसाचे गाळप सुरू केले. या ऊस गाळप हंगामासाठी एकूण ३४२२ एकर ऊस क्षेत्र नोंदण्यात आले आहे. यामध्ये १.०३ लाख क्विंटल साखर उत्पादन आणि १.०२ मिलियन टन ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासोबतच कारखान्याने ९.३१ मेगावॅट विज उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. साखर कारखान्याने सांगितले की, यापैकी ३.०२ मेगावॅट विजेचे उत्पादन कारखाना करू शकेल. आणि उर्वरीत ६.२४ मेगावॅट विज विक्री केली जाणार आहे.
साखर कारखान्यात दोन वर्षांच्या खंडानंतर ऊसाचे गाळप करण्यात येत आहे. प्रशासनाने सांगितले की, प्रचंड दुष्काळ पडल्याने २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन्ही हंगामात कारखाना सुरू होऊ शकला नव्हता. ऊस वाहतुकीच्या सुविधेसाठी नोंदणी केलेल्या उसाची उचल करण्यासाठी कारखान्याने ४८ टेंपो, ५० ट्रॅक्टर, १४ टिपर, २६ बैलगाड्या अशी व्यवस्था निर्माण केली आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर ऊसाचा पुरवठा करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.