चेन्नई : आगामी सांबा हंगामात २५.३५ लाख हेक्टरमध्ये शेती केली जाणार आहे. अशी माहिती कृषी मंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम यांनी दिली. यामध्ये भात पिक १२.१३ लाख हेक्टर, बाजरी ४.६२ लाख हेक्टर, डाळी ५.३४ लाख हेक्टर, कापूस ०.५३ लाख हेक्टर, ऊस ०.६२ लाख हेक्टर आणि तीळ २.११ लाख हेक्टरमध्ये पिकवले जाईल. मान्सून आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून मंत्री पनीरसेल्वम बोलत होते.
२०२१-२२ मधील पूर्वोत्तर मान्सूनदरम्यान जोरदार पाऊस झाल्याने आगामी मान्सून कालावधीचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देताना मंत्री म्हणाले की, मान्सूनदरम्यान भाताच्या पिकातील अतिरिक्त पाणी लवकर बाहेर काढण्यासाठी व्यवस्था केली जाणे अपेक्षित आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ४० लाख एकरमधील पिकांचा विमा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात १८.५२ लाख शेतकऱ्यांना आधीच्या सांबा हंगामातील पिक नुकसान भरपाईचे ४८१ कोटी रुपये वितरीत केले जातील, असे त्यांनी सांगितले.