वेल्लोर : वेल्लोर सहकारी साखर कारखान्याशी संलग्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता कामगारांच्या टंचाईचा मुद्दा भेडसावणार नाही. कारखान्याचे अध्यक्ष एम. आनंद यांच्याहस्ते १.४० कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ऊस तोडणी मशीनचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्यांदाच ट्रॅक्टर निर्मात्यांनी तामीनळाडून ऊस तोडणी मशीन उपलब्ध करून दिले आहे असे यावेळी आनंद यांनी सांगितले.
एका नव्या योजनेअंतर्गत साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक रजिस्टर बनविण्यात आले आहे. त्यामध्ये आधी नोंदणी करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना हे यंत्र पाठवले जाईल. हे ऊस तोडणी मशीन दररोज ३ एकर ऊसाची तोडणी करू शकते. या मशीनचे शुल्क प्रती टन ७०० रुपये आहे असे आनंद यांनी सांगितले. तोडणी मशीनबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात कुतुहल आहे. यापूर्वी ऊस तोडणीसाठी कामगारांची टंचाई असल्याने शेतकरी पिक घेण्याबाबत विचार करीत असायचे. या हंगामात जवळपास २ लाख टन ऊस गाळप करण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे. आता मशीन आल्याने यात आणखी वाढ होईल. पुढील हंगामात सहजपणे २ लाख टन गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करणे शक्य आहे, असे आनंद म्हणाले.