अहिल्यानगर:जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत राहुरी येथील डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला.तनपुरे कारखान्याकडे जिल्हा बँकेचे १३४ कोटी रुपयांचे कर्ज आहे.त्याच्या वसुलीसाठी यापूर्वी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली.मात्र अपेक्षित निविदा न आल्याने आता चौथ्यांदा निविदा काढली जाणार आहे.त्यासाठीच्या अटी व नियम राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर असतील, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयावर गुरुवारी (दि.२०)जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली.
बैठकीनंतर कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आजच्या बैठकीत चौथ्यांदा निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.सहकार कायद्यानुसार ही अंतिम निविदा असू शकते.यात पात्र ठरेल त्याला कारखाना करारानुसार चालविण्यास देण्यात येईल.कोणीही पात्र ठरले नाही, तर याबाबतचा पुढे बँक निर्णय घेईल.निविदा राज्य सहकारी बँकेच्या नियमांनुसार प्रसिद्ध केली जाईल.त्यासाठीच्या काही अटी शिथील केल्या जाऊ शकतात.दरम्यान, अजित पवार यांच्या कंपनीची निविदा आली, यात पात्र ठरली तर त्यांना कारखाना चालवायला देणे गैर नाही, असेही कार्डिले म्हणाले.निविदा प्रसिद्ध करताना त्यामध्ये कामगारांच्या देण्याबाबतही वनटाईम सेटलमेंटवरही विचार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, तनपुरे कारखान्याची आधी निवडणूक होऊ द्यावी, नंतरच निर्णय घ्यावा अशी भूमिका जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी मांडली.