अरुशा : टांझानिया सरकारने मोरोगोरो विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अजानिया बँक लिमिटेडद्वारे घेतलेल्या २.७ बिलियन (२७० कोटी रुपये) कर्जाची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्री एडोल्फ मॅकेंडा यांनी सांगितले की, ते लवकरच याबाबत अजानिया बँकेच्या प्रशासनाची भेट घेतील आणि कर्जाच्या फेररचनेची मागणी केली जाईल.
मोरोगोरो विभागातील केमकुलाजी आणि एमबीगिरी या दोन साखर कारखान्यांनी करारानुसार परिसरातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी सुरू केलेली नाही. मंत्री एडोल्फ मॅकेंडा यांनी गेल्या आठवड्यात आपल्या दौऱ्यावेळी ऊस उत्पादक शेतकरी आणि मकुलाजी होल्डिंग कंपनी लिमिटेड यांच्यातील वादाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मकुलाजी होल्डिंग कंपनी लिमिटेडची २०१७ मध्ये देशात नवी साखर उत्पादक कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली होती. या कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता २ लाख टन आहे. ही टांझानियातील सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी म्हणून प्रस्तावित करण्यात आली होती. देशातील साखरेच्या कमतरतेला पूर्ण करण्यासह साखरेची १ लाख टनाच्या निर्यातीचेही उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, चार वर्षानंतरही राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा कोष (एनएसएसएफ) आणि सार्वजनिक क्षेत्रातील सामाजिक सुरक्षा कोष (पीएसएसएसएफ) यांदरम्यानचा हा संयुक्त उपक्रम अद्याप प्राथमिक अवस्थेतच आहे. लवकरच साखरेचे उत्पादन सुरू होईल असे आश्वासन मंत्री एडोल्फ मॅकेंडा यांनी दिले आहे.