नवी दिल्ली : भारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. एफआयपीआय पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
मंत्री प्रधान म्हणाले, देशात यापूर्वी २०१४ पर्यंत पेट्रोलमध्ये ५ टक्क्यांऐवजी १ टक्काच इथेनॉलचे मिश्रण केले जात होते. आता २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट ठेवले आहे. गेल्या काही वर्षात हे इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढले असून ते ८.५ टक्क्यांवर आले आहे. पुढील वर्षी ते दहा टक्क्यांवर नेण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सरकारने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट ठेवले होते. मात्र आता २० टक्क्यांचे उद्दीष्ट २०२४-२५ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. देशात जेव्हा इथेनॉल मिश्रणाची उद्दीष्टपूर्ती होईल, तेव्हा भारत ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर असेल. सद्यस्थितीत देश आपल्या खनिज तेलाच्या गरजेपैकी ८३ टक्के आयात करतो. इथेनॉल मिश्रणानंतर पेट्रोल आयातीची गरज कमी होईल. याशिवाय, इथेनॉल कमी प्रदूषण फैलावणारे इंधन आहे. त्यातून कार्बन उत्सर्जनात घट होईल.
मंत्री प्रधान म्हणाले, २०२५ पर्यंत वीस टक्के वाढीसाठी देशाला १००० कोटी लीटर इथेनॉलची गरज असेल. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविल्यास साखर कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना उसाची थकीत रक्कम देण्यास मदत होईल. आपल्याकडे इथेनॉल-पेट्रोल मिश्रणात पहिल्या क्रमांकाचा देश बनण्याची क्षमता आहे.