सांगली : तासगाव कारखान्याला आर्थिक अडचणीमुळे गेल्यावर्षीचा गळीत हंगाम घेता आला नाही. मात्र येणाऱ्या हंगामात ऊस उत्पादकांना विश्वासात घेऊन ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आखून त्या प्रत्यक्षात आणल्या आहेत. त्याचा फायदा साखर कारखानदारीला होत असल्याचे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
जी. झेड. अँड एस. जी. ए शुगर्स (तासगाव कारखाना युनिट) कारखान्याचा २०२३ – २४ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी कारखाना कार्यस्थळावर प.पू. पारसनाथबाबा महाराज शिराळा, आनंदगिरी महाराज देशिंग, केळकरनाना महाराज सांगली, सिद्धलिंगेश्वर महाराज बेळंकी, बाळ महाराज कुकटोळी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
खासदार पाटील म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून त्याद्वारे दैनंदिन तीन लाख पन्नास हजार लिटर इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे. इथेनॉल निर्मितीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही उसाची योग्य किंमत देण्यासाठी मदत होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.
यावेळी आर. डी. पाटील यांनी स्वागत केले. युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सांगलीचे उद्योगपती अभय जैन, अरविंद तांबवेकर, नागेश मोहिते, वसंत चव्हाण, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.