सांगली : एस. जी. झेड. अँड एस. जी. ए. शुगर्स लिमिटेड तासगाव कारखाना युनिटमध्ये यंदा चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती प्रभाकर पाटील यांनी दिली. तुरची (ता. तासगाव) येथील एस. जी. झेड. अँड एस. जी. ए. शुगर्स लिमिटेड तासगाव कारखाना युनिटमध्ये रोलर पूजनप्रसंगी पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाठबळावर आगामी ऊस हंगाम यशस्वीपणे पार पाडला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून तासगाव कारखाना ओळखला जातो. यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाणार आहे.
खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, यावर्षीच्या हंगामासाठी ऊस वाहतूकदारांचे करार केलेले आहेत. भागातील वाहनांचेही करार केलेले आहेत. हंगामाची पूर्वतयारी झाली असून साडेतीन लाख लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी आनंदगिरी महाराज, ज्योती पाटील, डॉ. शिवानी पाटील आदी उपस्थित होते.