करदात्यांना दिलासा, एप्रिलच्या जीएसटी पेमेंटसाठी मिळाली मुदतवाढ

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यासाठी जीएसटी भरण्याची अंतिम मुदत सरकारने वाढवली आहे. या निर्णयाने लाखो करदात्यांना दिलासा मिळाला आहे. जीएसटी पोर्टलमधील तांत्रिक चुकांमुळे लाखो करदात्यांना पेमेंट करणे शक्य झाले नव्हते. सरकारने यासाठीच्या मुदतवाढीची घोषणा करतानाच आयटी कंपनी इन्फोसीसला यातील त्रुटींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टमने (सीबीआयसी) ट्वीट करून याची माहिती दिली आहे. सीबीआयसीने म्हटले आहे की एप्रिल महिन्यात जीएसटी पेमेंटची अंतिम तारीख २४ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी सीबीआयसीने म्हटले होते की इन्फोसिसने जीएसटी पोर्टलवर एप्रिल महिन्यासाठीचे जीएसटीआर – २बी आणि जीएसटीआर-३ बी मध्ये येणाऱ्या समस्यांची माहिती दिली आहे. एप्रिल २०२२ साठी जीएसटीआर ३ बी फॉर्म जमा करण्याची अंतिम मुदत २४ मे २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सीबीआयसीने इन्फोसिसला या अडचणी त्वरीत दूर करण्याचेही निर्देश दिले आहेत. सरकारने इन्फोसीसला यासंदर्भातील सर्व निर्देश दिले आहेत. टेक्निकल टीम जीएसटीआर २ बी प्रोव्हाइड करणे आणि जीएसटीआर ३ बी ऑटो पॉप्युलेट करण्यावर काम करीत आहे. करदात्यांना येणाऱ्या अडचणी पाहता अंतिम मुदतवाढीवर विचार करण्यात आल्याचे सीबीआयसीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here