हैदराबाद : वेलगातूर विभागातील स्तंबमपल्ली गावात कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (कृभको) अंतर्गत प्रस्तावित इथेनॉल योजनेसाठी जमिनीच्या सपाटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन समाज कल्याण मंत्री कोप्पुला ईश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य सरकारने या योजनेसाठी १०० एकर सरकारी जमीन निश्चित केली आहे. आणि या प्लांटमधून दरवर्षी ८ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करण्याची क्षमता असेल. सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या या इथेनॉल प्लांटच्या जमीन सपाटीकरणाच्या कामासाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या प्लांटमध्ये तांदूळ, भाताचा भुस्सा, मक्का यापासून इथेनॉल उत्पादन केले जाईल. कृभको राज्यातील प्रमुख भात, मक्का उत्पादक जिल्ह्यांपैकी एक असलेल्या जगतियाल जिल्ह्यात इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी पुढे आले आहे. जमीन सपाटीकरणाचे काम औपचारिकरित्या सुरू झाल्यानंतर बोलताना मंत्री ईश्वर यांनी सांगितले की, कृभको आणि राज्य सरकारदरम्यान संयुक्त प्रस्तावित उद्योग स्थानिक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. आणि जगतीयाल जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी देईल.
यादरम्यान, स्तंबमपल्ली, पाशीगाम आणि आसपासच्या अनेक गावातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित प्लांटच्या विरोधात रायपट्टनम पुलावरील महामार्गावर धरणे आंदोलन केले. या प्लांटचे त्यांच्या गावाच्या आसपास केली जाणारी उभारणी नुकसानकारक ठरेल असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्तळीत झाली.