हैदराबाद : केबी आसिफाबाद जिल्ह्यातील बाग कॉरिडॉर जंगलाशेजारी उभारण्यात येत असलेला इथेनॉल प्रकल्प हा वादात सापडला आहे. सह-वीज निर्मिती युनिटसह इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी मंजूर केलेले क्षेत्र वाघ कॉरिडॉरमध्ये येते. या प्लांटसाठी प्रस्तावित असलेल्या जागेत वाघ आणि बिबट्या तसेच इतर वन्यजीवांचा वावर पाहायला मिळतो.
या प्रकल्पासाठी इथेनॉल सिबस प्रॉडक्ट्स कंपनीला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून पर्यावरण मंजुरी मिळाली आहे. तथापि, राज्याच्या वनविभागाने वाघांचा वावर असलेले वनक्षेत्र ‘संवर्धित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याच्या नुकत्याच केलेल्या प्रस्तावामुळे नॅशनल बोर्ड फॉर वाइल्डलाइफ (NBWL) कडून मंजुरी मिळेपर्यंत इथेनॉल प्रकल्प चालवता येईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वनविभागाने सांगितले होते की, राज्य वन्यजीव मंडळाच्या यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत, तेलंगणातील कावलच्या व्याघ्र प्रकल्पाला महाराष्ट्रातील ताडोबाला जोडणाऱ्या व्याघ्र कॉरिडॉर क्षेत्रांना ‘संवर्धित क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील ११३ ब्लॉकमध्ये अंदाजे १,४९२ चौरस किलोमीटरमध्ये हे राखीव क्षेत्र पसरलेले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने यापूर्वी व्याघ्र कॉरिडॉर क्षेत्र म्हणून मान्यता दिलेल्या गारलापेट आरक्षित वन ब्लॉकमधील संवर्धन राखीव सीमेपासून प्रस्तावित जागा फक्त ६३ मीटर अंतरावर आहे.