संगारेड्डी : जिल्हा प्रशासनाने जहीराबाद येथील ट्रायडंट साखर कारखान्याच्या लिलावाचा निर्णय घेतला आहे. कारखाना प्रशासनाकडे ८४० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ११ कोटी ५० लाख रुपये दीर्घकाळ थकीत आहेत.
तेलंगणाटूडे या बेवसाइटने दिलेल्या माहितीनुसार, संगारेड्डीचे जिल्हाधिकारी एम. हनुमंथा राव यांनी सांगितले की, ट्रायडंट कारखान्याचे व्यवस्थापन २०१९-२० या गळीत हंगाातील थकीत रक्कम देण्यात अपयशी ठरले आहे. अर्थमंत्री टी. हरीश राव आणि अधिकाऱ्यांनी या संदर्भात वारंवार बैठका घेतल्या. त्यावेळी कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकीत पैसे देण्याचे आश्वासनही दिले. मात्र, या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारला कंपनीचा लिलाव करण्याचा पर्याय स्वीकारावा लागला आहे.
ऊस विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. रविंद्र यांनी सांगितले की ट्रायडंट साखर कारखान्याने २०१९-२० या हंगामात १७०८ शेतकऱ्यांकडून १.१० लाख टन ऊस खरेदी करून गाळप केले. त्यामध्ये ८४० शेतकऱ्यांचे ११.५ कोटी रुपये पैसे दिलेले नाहीत. लिलावात साखर कारखान्याला १०० कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लिलाव केल्यानंतर शेतकऱ्यांना सर्व थकीत रक्कम देण्याची कार्यवाही सरकार करेल.