नंदूरबार : राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत नंदूरबार कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पाहिजे तसा दर मिळत नसल्याने ऊस दराविषयी शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. परंतु इतर पिकांना लागणारा खर्च, त्यासोबतच करावी लागणारी मेहनत पाहता त्यामानाने ऊस नैसर्गिक संकटातही तग धरून राहतो म्हणून बहुतांश शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात ऊस लागवड स्थिर आहे. शहादा तालुक्यात ऊस लागवडीस अधिकची पसंती मिळाली आहे. अनेकांनी पपई, कापूस पिकांखालील क्षेत्र कमी करून किंवा क्षेत्र टाळून उसाची लागवड केली आहे.
तळोदा, शहादा तालुक्यांत बहुतांश शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड बऱ्यापैकी केली आहे. परिसरात दुर्गा खांडसरी, पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगर तसेच समशेरपूर येथील आयान मल्टी ट्रेड एलएलपी आदी कारखान्यांमध्ये परिसरातील ऊस गाळपासाठी जातो. मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या साह्याने बागायती शेती केली जाते. त्याचबरोबर केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे. परिणामी, उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत.