धाराशिव : तेरणा कारखाना २५ वर्षांच्या भाडेकरारावर घेऊन तब्बल ३ लाख १२ हजार मेट्रीक टन ऊस गाळप केले. परिसरातील इतर कारखान्यापेक्षा जास्तीचा भाव दिला. आता आगामी हंगामात कारखाना ६ हजार मेट्रीक टन प्रतिदिन गाळप क्षमतेने चालवून १०० किलोमीटर अंतरावरील इतर कारखान्याच्या भावापेक्षा ५१ रुपये भाव जास्त देईल. पुढील वर्षी १५ हजार मेट्रीक टन क्षमतेने गाळप करून शेतकरी सागेल तो भाव देऊ, अशी घोषणा भैरवनाथ शुगर सर्वेसर्वा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली. ढोकी येथील तेरणा साखर कारखाना परिसरात पालकमंत्री सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा स्नेह संवाद मेळावा मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री सावंत म्हणाले की, तेरणा साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात परिसरातील अन्य कारखान्यापेक्षा ५१ रुपये प्रती टन जादा दर देण्यात येईल. समुद्रे कुटुबियांनी पायात चप्पल न घालता तेरणा कारखाना कष्टातून उभा केला आहे. हा कारखाना ३३ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. माझ्या शेतकऱ्यास ऊस गाळपास पाठविण्यासाठी कोणाच्या दारात लागणार नाही. तेरणा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहील. यावेळी डॉ. सजीव माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ऊस लागवड व ऊसाची जोपसणा कशी करायची, कोणत्या वेळी कोणते खते वापरायचे व उस उत्पादन कसे वाढवायचे या विषयी मार्गदर्शन केले. कारखान्याचे ज्येष्ठ सभासद व भैरवनाथ शुगर संचलीत तेरणेला सर्वाधिक ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री सावंत यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी तेरणा बचाव संघर्ष समितीचाही सत्कार करण्यात आला. शेतकरी सभासदास भैरवनाथ शुगरच्या वतीने गमजा व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले.