उत्तर पश्चिम पाकिस्तानमधील साखर कारखानदारांकडून दहशतवादी करताहेत खंडणी वसूल

इस्लामाबाद (पीटीआय) : बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) संघटना खैबर पख्तूनख्वा येथील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करत असल्याचे वृत्त आहे. जर कारखानदारांनी पैसे दिले नाहीत, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली जात आहे. पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनच्या खैबर पख्तूनख्वा झोनच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर, राज्यपाल फैसल करीम कुंडी आणि पेशावरचे लेफ्टनंट कॉर्प्स कमांडर जनरल उमर बुखारी यांना पत्रे पाठवली आहेत. या पत्रात म्हटले आहे की, या भागात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांकडून कारखानदारांना सतत खंडणीच्या धमक्या मिळत होत्या. डेरा इस्माईल खानच्या रमक भागातही खंडणी सुरू होती. ‘टीटीपी’च्या अतिरेक्यांनी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास कारखान्यांवर सशस्त्र हल्ले करण्याची धमकीही दिली आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, या साखर कारखान्यांच्या महाव्यवस्थापकांना धमकीचे फोन येत आहेत. यात त्यांना सरकारऐवजी अतिरेक्यांना कर देण्याचे निर्देश दिले जात आहेत. जर त्यांनी आदेशाचे पालन केले नाही तर कारखान्यांवर सशस्त्र हल्ले करण्यासह गंभीर परिणामांची धमकी कॉल करणाऱ्यांनी दिली आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक कामगारांना होणाऱ्या त्रासाबद्दल अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आणि रमकमध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी आणि कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (केपी झोन) ने अधिकृत पत्रांद्वारे अधिकाऱ्यांना परिस्थितीची औपचारिक माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here