Tesla लवकरच भारतीय रस्त्यावरून धावणार

मुंबई : भारतीयांची टेस्लाची इलेक्ट्रिक कार घेण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. टेस्लाचा पुण्यात कार्यालय सुरु करण्यासाठीचा करार पूर्ण झाला आहे. सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टेसला भारतात आगमन प्रक्रियेला वेग आला आहे. जूनपासून टेस्लाने अनेक पातळ्यावरील प्रक्रिया पूर्ण केल्या असून भारतीय रस्त्यावर टेस्लाची इलेक्ट्रिक कार धावू शकते.

ब्लूमबर्गच्या एक रिपोर्टनुसार, पुढील वर्षात कंपनीची इलेक्ट्रिक कार भारतीय रस्त्यावर धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या करारातंर्गत कंपनी दोन वर्षांच्या आत देशात फॅक्टरी उभारणार आहे. तर इलेक्ट्रिक कारची आयात करणार आहे. जानेवारी महिन्यात ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट’ होत आहे. त्यात याविषयीची अधिकृत घोषणा होऊ शकते.

टाईम्स ऑफ इंडियानुसार, टेस्ला भारतात जवळपास 5 लाख इलेक्ट्रिक कार तयार करण्याचे उद्दिष्ट घेऊन दाखल होईल. टेस्लाची इलेक्ट्रिक कार 20 लाख रुपयांपासून भारतात विक्री होईल. जर ही योजना पूर्ण झाली तर भारतीय इलेक्ट्रिक बाजारात तीव्र स्पर्धा असेल. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा आणि फीचर्ससह कार उपलब्ध होतील.

भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टेस्लाचा लवकरच प्रवेश होईल. त्यापूर्वीच टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पुण्यात पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालय थाटणार आहे. त्यासाठी त्यांनी भाडे तत्वावर कार्यालय पण घेतले आहे. बी विंगच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय आहे. हे कार्यालय 5,580 चौरस फुट इतके आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटिडेसोबत त्यासाठी करार झाला आहे. भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात किंवा यापैकी एका ठिकाणी कंपनी कारखाना उभारु शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here