सिंगापूर : थायलंडमध्ये ३१ मार्च अखेरीस ऊस हंगाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. उद्योग जगतातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६६.५ मिलियन टन ऊस उपलब्धतेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. २२ मार्च अखेरीस एकूण उसापैकी ६६.४८ मिलियन टन उस आला आहे. गेल्यावर्षीच्या या काळातील उसाच्या तुलनेत हे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी आहे. दरवर्षी ऊस हंगाम एप्रिल-मे महिन्यात पूर्ण होतो. मात्र, यंदा उसाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हंगाम लवकर संपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपलब्ध अहवालानुसार, थायलंडच्या ५७ साखर कारखान्यांपैकी फक्त ४ कारखान्यांचे गाळप अद्याप सुरू आहे.
दरम्यान, या हंगामात साखरेचा उतारा वाढल्याचे दिसून आला आहे. गेल्या गळीत हंगामात साखरेचा उतारा ११.०३ टक्के इतका आहे. मात्र, सध्या उतारा ११.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. थायलंड सरकारने ऊस जाळण्याचे प्रकार कमी करण्यासह वायू गुणवत्ता सुधारण्यास प्राधान्य दिल्याने हा परिणाम झाला आहे. उद्योग विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, ऊस तोडणीला नियमांचा अडथळा येत आहे. मात्र, यामुळे साखरेचा उतारा वाढला असून वायू प्रदूषणातही घट झाली आहे.