कोल्हापूर : आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांबाबत हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत थाळी नाद मोर्चा काढला. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले. वाघमोडे यांनी कामगारांच्या प्रश्नांबाबत कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दि. ८ रोजी दुपारी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी लक्ष्मी मंदिरपासून काढलेला मोर्चा प्रांत अधिकारी कार्यालयावर आला. यावेळई कामगारांनी सांगितले की, गेल्या ११ महिन्यापासून कारखाना प्रशासनाने कामगारांना मागितलेली माहिती दिली नाही. आधीच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आगामी बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, एमडी व सेक्रेटरींना बोलवावे. त्यावेळी ठोस निर्णय घ्यावा. दिनकर कोराटे, पांडुरंग कदम, अशोक कांबळे, संभाजी बुगडे, आप्पासाहेब लोंढे, सुभाष पाटील, महादेव मांगले आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात कामगार संघटनेचे अध्यक्ष खोत आणि पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांच्यामध्ये वाद झाला.