कोल्हापूर : उसाला चांगला भाव मिळू लागल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र ४ हजार हेक्टरने कमी झाले, तर उसाचे क्षेत्र तब्बल १६ हजार हेक्टरने वाढले आहे. गेल्या दोन वर्षांत सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात घसरणीमुळे भुईमुगालाही अपेक्षित दर मिळाला नाही. त्या तुलनेत उसाला बऱ्यापैकी, तेही एकरकमी दर मिळत असल्याने क्षेत्र वाढले आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे ७,७६,००० हेक्टर आहे. त्यापैकी ५,०७,००० हेक्टर लागवडीलायक आहे. खरिपात सर्वाधिक भात पीक ९२ हजार हेक्टरवर घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन, भुईमूग या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात भात, ज्वारी, नागली, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. मात्र, आता ऊस क्षेत्राची वाढ होत आहे. यंदा मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.