नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या (पीएम किसान) १४ व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा आहे. हा हप्ता एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीत जारी केला जाऊ शकतो. अद्याप सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे, अशा शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६,००० रुपये सरकारकडून दिले जातात. शेतकऱ्यांना समान तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात. प्रत्येक हप्त्यामध्ये २,००० रुपये दिले जातात.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता जारी केला होता. पंतप्रधानांनी डीबीटीच्या माध्यमातून १६,००० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केले होते. या १३ व्या हप्त्याचा फायदा ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे. जे शेतकरी शेती करतात, मात्र, शेतीवर त्यांचे नाव नसेल, वडील तसेच भावाचे नाव असेल तर अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. दुसऱ्याची जमीन भाडेपट्टीने घेवून शेती करणाऱ्यासही याचा लाभ मिळत नाही. जर एखाद्या कुटूंबातील व्यक्ती संविधानीक पदावर असेल तर त्याला योजनेतून वगळले जाते. डॉक्टर, इंजिनीअर, सीए, आर्किटेक्ट, वकील अशा व्यावसायिकांनाही योजनेचा लाभ दिला जात नाही. १०,००० रुपयांहून अधिक मासिक पेन्शन घेणाऱ्या व्यक्ती अथवा निवृत्त कर्मचाऱ्यांनाही योजनचा फायदा घेता येत नाही अशी तरतुद आहे.