नवी दिल्ली : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऊस उत्पादक शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या अन सध्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या अभिजीत पासाण्णा यांनी दिल्लीत काही कामानिमित्त गेलेल्या शेट्टी यांना बोलावून आदरातिथ्य केले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी निधीही दिला. एका ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मुलाच्या दैदीप्यमान प्रवासाबद्दल राजू शेट्टी यांनी या पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिजीतचे यश पाहून शेतकरी चळवळीसाठी आपण खर्च केलेली ३० वर्षे सार्थकी लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘माय महानगर’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राजू शेट्टी यांनी २००२ साली उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसदर वाढ आंदोलन केले. उसाला १२०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात राजू शेट्टी हे जखमीही झाले होते. आंदोलन यशस्वी झाले आणि शेट्टी शेतकरी नेते म्हणून नावारूपाला आले. त्यांची अनोखी आंदोलने राज्यभर चर्चेत ठरली. दरम्यान, शेट्टी २००३ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी आमदारकी आणि त्यानंतर खासदारकीची निवडणुकही जिंकली. दिवसेंदिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जनाधार वाढत गेला. आणि बघता बघता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारली.
माजी खासदार शेट्टी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी काही कामानिमित्त दिल्लीत असताना एका व्यक्तीने मला गुडगाव येथील त्यांच्या घरी जेवायला बोलावले. गुडगांव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील त्यांच्या घरी गेल्यावर दारात सुंदर रांगोळी, फुलांचा सडा घालून औक्षण केले. यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांसोबत भाकरी, खर्डा, दही असा गावरान बेत असलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. या कुटूंबाने शाल व श्रीफळ देवून माझा कौटुंबिक सत्कार केला. सत्कारावेळी त्यांनी माझ्या हातात ‘लोकसभा २०२४’ साठी २५ हजार रुपयांचा धनादेश दिला. हा सगळा पाहूणचार अभिजीत पासाण्णा यांनी केला.
माजी खासदार शेट्टी यांनी ऊस आंदोलनाच्या माध्यमातून ७०० रुपयांचा दर ३००० रुपयांवर आणला. त्यातून माझ्या वडिलांना आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो, अशा भावना अभिजित पासाण्णा यांनी व्यक्त केल्या. अभिजित यांनी आयआयटी चेन्नईमधून इंजिनीअरिंगचे पदव्यूत्तर शिक्षण घेऊन जनरल मोटर्स व पीएसए ग्रुपमध्ये नोकरी केली. गेली तीन वर्षे ते गुडगांव येथील डायको मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअरींग विभागप्रमुख आहेत. त्यांचे भाऊ अमेरिकेत ‘मर्सिडीझ बेन्झ’ कंपनीमध्ये कार्यरत आहे. एका सामान्य ऊस उत्पादकाच्या मुलांचा हा प्रवास पाहून चळवळीसाठी खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.