जिनिव्हा : ग्लोबल वॉर्मिंगचे युग संपले असून आता आपण ‘ग्लोबल बॉइलिंग’च्या युगात प्रवेश केल्याचे मत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केले आहे. जुलै २०२३ हा जगातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना असल्याची शास्त्रज्ञांनी पुष्टी केल्यानंतर गुटेरेस यांनी टिप्पणी केली आहे. गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार, ही तर नुसती सुरुवात आहे, वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
जागतिक पातळीवर उष्णतेचे रेकॉर्ड सुरू झाल्यापासून गेले तीन आठवडे सर्वात उष्ण राहिले आहेत आणि जुलै २०२३ हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि EU च्या कोपर्निकस अर्थ निरीक्षण कार्यक्रमानुसार, जीवाश्म इंधनाचा अतिवापर आणि पर्यावरणाची अपरिमित हानी यामुळे जागतिक तापमानाने या महिन्यात सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत.
सरासरी जागतिक तापमानात सतत होणारी वाढ धोक्याची घंटा असल्याचे मतही शास्त्रज्ञांनी मांडले आहे. गुटेरेस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले कि, उत्तर अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि युरोपसाठी हा उन्हाळा खूपच क्रूर आहे. संपूर्ण ग्रहासाठीच ही एक आपत्ती आहे. गुटेरेस यांनी याप्रश्नी सर्व देशांच्या प्रमुखांना तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनमधील हवामान शास्त्रज्ञ फ्रेडरिक ओटो म्हणाले, आपल्याला अशास्थितीत जगण्याची सवय करावी लागेल.