चीनी मंडी, कोल्हापूर: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे यंदाच्या नैपुण्य पारितोषिकांची आज घोषणा करण्यात आली, त्यात एकूण १९ पैकी ९ पारितोषिके पटकावून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्यासाठीचे वसंतरावदादा पाटील पारितोषिक पुणे जिल्ह्यातील पारगावच्या ‘भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने’ मिळवलेले आहे.
देशातील एकूण ८३ कारखान्यांनी यात सहभाग घेतला होता. महाराष्ट्रा खालोखाल उत्तर प्रदेशातील चार कारखान्यांनी पारितोषिके मिळवली आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा असून गुजरात, मध्य प्रदेश व तामिळनाडू यांनी प्रत्येकी एक एक पारितोषिके मिळवली आहेत.
दिल्ली येथे हा पारितोषिक वितरण समारंभ दहा सप्टेंबर रोजी होणार आहे. या समारंभास अध्यक्षस्थानी माजी कृषिमंत्री शरद पवार असतील तर प्रमुख अतिथी असतील अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, परिवहनमंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.
पारितोषकांचे मानकरी-
- सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना – सोनहिरा कारखाना, वांगी (सांगली).
- उच्चांकी उसगाळप – प्रथम क्रमांक – विठ्ठलराव शिंदे कारखाना, माढा (सोलापूर).
- उच्चांकी साखर उतारा – प्रथम क्रमांक – कुंभी कासारी कारखाना (कोल्हापूर).
- ऊस उत्पादकता पारितोषिक (उच्च उतारा) – प्रथम क्रमांक – जी. डी. बापू लाड कारखाना (सांगली), द्वितीय – नागनाथअण्णा नायकवाडी हुतात्मा कारखाना (सांगली).
- वित्तीय व्यवस्थापन – प्रथम क्रमांक – सह्याद्री कारखाना (सातारा).
- तांत्रिक नैपुण्य – प्रथम क्रमांक – श्री. विघ्नहर साखर कारखाना, जुन्नर (पुणे), द्वितीय क्रमांक – पांडुरंग कारखाना, श्रीपूर (सोलापूर).