भीमाशंकर कारखान्याची गाळप क्षमता होणार सहा हजार टन : दिलीप वळसे पाटील

पारगाव (पुणे) : येथील भीमाशंक़र साखर कारखानाही इथेनॉल निर्मितीकडे वळला असून, इथेनॉल निर्मितीसाठी डीस्टलरीची उभारणी करणार आहे. या प्रकल्पासाठी कारखान्याला केंद्र सरकारची परवानगी मिळाली असून, कारखाना आपली गाळप क्षमताही वाढवणार आहे. सध्या कारखान्याची गाळप क्षमता साडे चार हजार टन आहे ती आता सहा हजार टन इतकी वाढेल, असे कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

भीमाशंकर कारखान्याच्या 20 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी बॉयलर अग्नीप्रदीपन संचालक अशोक घुले व त्यांच्या पत्नी अंजली यांच्या हस्ते झले. तर गव्हाण पूजन संचालक आण्णासाहेब पडवळ व त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या हस्ते झाले.  दिलीप पाटील म्हणाले, कारखान्याने मागील गाळप हंगामात 180 दिवसात 8 लाख 12 हजार 909 टन ऊसाचे गाळप करुन 11.85 टक्के साखर उतार्‍याने 9 लाख 62 हजार 475 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

सहविजनिर्मितीतून 188 दिवसात 6 कोटी 92 लाख 90 हजार युनिट वीजनिर्मिती केली. कारखाना वापर वजा जाता 4 कोटी 54 लाख 95 हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. पण यंदा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे ऊसाचे उत्पादन घटणार आहे. याचा परिणाम ऊस गाळपावर होणार आहे. शिवाय ऊसावर हुमणी आणि तांबेऱ्याचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

स्वागत प्रास्ताविक उपाध्यक्ष बाळसाहेब बेंडे यांनी केले. तर सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. ज्ञानेश्‍वर गावडे यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी आम. सूर्यकांत पलांडे, कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, सदाशिव पवार, केशर पवार, प्रकाश पवार, उषा कानडे, विश्‍वास कोहकडे, सविता बगाटे, अरुणा थोरात, वर्षा शिवले, सुषमा शिंदे, पुष्पलता जाधव, चंद्रकांत ढगे, रामनाथ हिंगे आदी उपस्थित होते

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here