सी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण कमी, केंद्राच्या निर्णयाने साखर उद्योगाला अत्यल्प दिलासा

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने बुधवारी सी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात ३ टक्के वाढ करत तेल कंपन्यांसाठी प्रति लिटर ५७ रुपये ९७ पैसे हा खरेदी दर निश्चित केला. मात्र, सी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण अत्यल्प असल्याने साखर उद्योगाला त्याचा फारसा फायदा होणार नाही. केंद्राकडून उसाच्या रसापासून तसेच बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात किमान दीड ते दोन रुपयांची वाढ होईल आणि साखर किमान विक्री दरात वाढीचा निर्णय होईल, अशी उद्योगाची अपेक्षा होती. मात्र, तसे झालेले नाही.

सद्यस्थितीत देशात इथेनॉल उत्पादन क्षमता १६८५ कोटी लिटर इतकी आहे. तर २०२३-२४ या इथेनॉल पुरवठा वर्षात ५५० कोटी लिटरचा पुरवठा झाला आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणासाठी इथेनॉलची गरज १०१६ कोटी लिटर इतकी आहे. चालू हंगामात देशातील साखरेचे उत्पादन २६५ लाख टनाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. देशाची गरज २९० लाख टन असल्याने मागणीपेक्षा उत्पादन कमी राहणार आहे. उसाच्या रसापासून तसेच बी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केल्यास इथेनॉलचे उत्पादन वाढेल. मात्र, साखरेचे उत्पादन कमी होईल, या शक्यतेने सरकारने दोन्ही इथेनॉलचे दर वाढवले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here