गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचा केंद्र सरकारचा दावा

नवी दिल्ली : महागाईच्या वाढत्या चिंतेदरम्यान कृषी क्षेत्राने दिलासा दिला आहे. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यानंतरही देशाचा धान्यसाठा कमी होणार नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये खराब हवामानामुळे गव्हाच्या पिकाचे अंशतः नुकसान झाले आहे. मात्र, एकूण देशातील गहू उत्पादन कमी होणार नाही. उद्दिष्टानुसार ११.२२ कोटी टन गव्हाचे उत्पादन होईल. मध्य प्रदेश, छत्तीसगढसह अनेक राज्यांमध्ये अनुमानापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे. उद्दिष्टानुरुप गव्हाच्या बंपर उत्पादनामुळे महागाईवर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या १५-२० दिवसांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांपैकी प्रमुख असलेल्या गव्हाचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. मात्र, या राज्यांकडून आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने या शंकेचे निरसन केले आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गव्हाचे उत्पादन कमी होणार नाही. मात्र, काही प्रमाणात उत्पादनाची गुणवत्ता खालावू शकते. त्यामुळे विक्री वेळी शेतकऱ्यांसमोर अडचणी येतील. यंदा केंद्राने ३४२ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

केंद्रीय अन्न सचिव संजीव चोपडा यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची आढावा केंद्र सरकारची पथके संबंधीत राज्यांमध्ये घेत आहेत. राज्यांकडूनही अहवाल सादर झाला आहे. कृषी मंत्रालयाशीही एक दिवस आधी चर्चा जाली आहे. पंजाब, हरियाणासारख्या एक-दोन राज्यांत गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, इतर राज्यांत नुकसानीचे वृत्त नाही. बिहार, युपीसारख्या राज्यांत उशीरा येणाऱ्या पिकामुळे फारसे नुकसान झालेले नाही. याउलट उत्पादन वाढण्याची शक्यता काही ठिकाणी वर्तविण्यात आली आहे. यावर्षी एकूण ३२.३६ कोटी टन धान्य उत्पादन होईल अशी शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या, ३१.५६ कोटी टनाच्या तुलनेत हे उत्पादन ८० लाख टनाने अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here