सातारा : सहयाद्री सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या हंगामात ऊस गाळपाबरोबर प्रतिदिन एक लाख लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पातून उत्पादन सुरु होणार आहे. केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन साखरेची किमान किंमत वाढवावी, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२०२५ च्या ५१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संचालक संतोष घार्गे व त्यांच्या पत्नी रेखा घार्गे यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी आ. पाटील बोलत होते. याप्रसंगी सह्याद्रीच्या उपाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, युवा नेते जशराज पाटील, माजी सभापती प्रणव ताटे, मारुती बुधे, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, बाळासाहेब जगदाळे, भरत शिंदे, रमेश जाधव, आजी माजी संचालक उपस्थित होते.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, साखरेची किंमत वाढवल्यास त्याचा सभासद शेतकऱ्यांना फायदा होईल. एफआरपी कायदा सर्वांनी पाळणे बंधनकारक आहे. सभासदांनी अन्यत्र ऊस न घालता ‘सह्याद्री’लाच ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी संचालक संतोष घार्गे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आर. जी. तांबे यांनी केले. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी मानले.