अहिल्यानगर : उसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. मात्र साखरेच्या किंमतीत वाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ४२०० ते ४५०० रुपये करावा. इथेनॉल दरवाढ करावी, अशी मागणी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ यांनी केली. याबरोबरच केंद्राने रॉ शुगर निर्यातीला परवानगी देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. अशोक उद्योग समूहाचे प्रमुख, माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या अधिपत्याखालील साखर कारखान्याचा २०२४-२५ या ६८ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अशोक कारखाना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला भाव देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
धुमाळ, कामगार प्रतिनिधी मंडळ कार्याध्यक्ष अविनाश आपटे, माजी चेअरमन सुरेश गलांडे, कोंडीराम उंडे, रावसाहेब थोरात, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, संचालक मंजुश्रीताई मुरकुटे, प्रा. डॉ. सुनिता गायकवाड, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली. संचालक यशवंत बनकर व त्यांची पत्नी स्वातीताई आणि ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ व त्यांची पत्नी अरुणाताई यांच्या हस्ते विधीवत गव्हाण पूजन करण्यात आले. चेअरमन सुभाष चौधरी, रा.यु.काँ. माजी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे, भास्करराव मुरकुटे, काशिनाथ गोराणे आदी उपस्थित होते.