पुणे : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकार गळीत हंगाम पुन्हा सुरू करण्यासाठी आजारी साखर कारखान्यांना मदत करण्यास तयार आहे. त्यासाठी साखर कारखान्याचे संचालक मंडळ किंवा प्रशासकांना सरकारला प्रस्ताव सादर करावा लागेल, असेही पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे. नुकतेच शाह यांनी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर सांगितले होते की, सहकारी संस्थांसाठी विविध योजनांतर्गत मोठा निधी उपलब्ध आहे, ज्याचा वापर डिस्टिलरी उभारण्यासाठीही केला जाऊ शकतो. राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यासाठी कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, असेही शाह म्हणाले होते.
अजित पवार म्हणाले कि, राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादनाची सुविधा असावी यासाठी राज्य सरकार उत्सुक आहे. आता केंद्रीय मंत्री शाह यांनी स्वत: मदतीचा हात पुढे केल्याने राज्यातील साखर कारखान्यांकडून या दिशेने सकारात्मक पावले उचलली जातील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) साखर कारखान्यांना मदत करण्यास तयार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
दरम्यान, इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी साखर कारखान्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना’ अंतर्गत, केंद्राने नवीन डिस्टिलरीज उभारण्यासाठी/विद्यमान डिस्टिलरीजचा विस्तार आणि इन्सिनरेशन बॉयलर बसवण्यासाठी किंवा इन्सिनरेशन बॉयलरची स्थापना करण्यासाठी बँकांमार्फत सॉफ्ट लोनचा विस्तार केला आहे. केंद्र सरकारने 2018-21 मध्ये अधिसूचित केलेल्या सर्व योजनांच्या संदर्भात कर्ज वितरणाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.