मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आजपासून राज्यातल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाचा प्रारंभ झाला. यानिमित्ताने मुंबईतल्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थितीत होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर उपस्थीत मान्यवरांनी ऑगस्ट क्रांती मैदानातील स्मारक स्तंभाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मैदानात उभारलोल्या शिलाफलकमचे (स्मारक फलक) अनावरणही गेले गेले. या फलकावर, इथल्या भागातल्या स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांची नावे कोरली आहेत. यावेळी या ऐतिहासिक मैदानावर उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांनी हातात माती घेऊन, पंच प्रण विषयी शपथही घेतली. यावेळी वसुधा वंदन उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानात वृक्षारोपणही केले गेले. यासोबतच ऑगस्ट क्रांती मैदानातील प्राचीन वांस्तूशी संबंधीत विविध विकासकामांचे उद्घाटनही आज करण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या बलिदानामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘स्वदेश’, ‘स्वधर्म’ आणि ‘स्वाभिमान’ जागृत झाला आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले . देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आयुष्य पणाले लावले. त्यांच्या बलिदानामुळेच स्वातंत्र्याचा सूर्य आज उगवला आहे. मेरी माटी मेरा देश’. या अभियानात महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
महात्मा गांधी यांनी याच ठिकाणाहून इंग्रजांना ‘चले जाव’ असे ठणकावून सांगितले. त्यांनी ‘करो या मरो’चा नारा देत तरुणांमध्ये चेतना जागृत केली. त्यानंतर इंग्रजांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या त्यागामुळेच आपण आज हा ‘अमृतक्षण’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करतोय. या महोत्सवाचा समारोप देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी अभियानाने होत आहे. या अभियानात महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
क्रांतिकारक, समाजसुधारक, कागमार, शेतकरी, आदिवासी बांधव या सगळ्यांनी देखील आपापल्यापरिने स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिले. त्यामुळे त्यांचे केवळ स्मरण करण्यापर्यंतच न थांबता त्यांची देशाप्रती असलेली एकनिष्ठा तरुणांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही व्यापक संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेम रुजविण्याचे काम होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 7500 कलशांमधून माती आणून दिल्ली येथे अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे. ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. ‘इंडिया @75′ या उपक्रमात 10,64,410 कार्यक्रम संपन्न झाले. अगदी त्याचप्रमाणे ‘’मेरी माटी मेरा देश’ या अभियातही आपण अग्रेसर रहायचे आहे. ग्रामपंचायत ते शहर स्तरापर्यंत याची व्यापक अंमलबजावणी होणार आहे. यातही आपला महाराष्ट्र अव्वल राहील, असा विश्वासही यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देशातील गुलामगिरीच्या खुणा संपवायच्या आहेत. आपली संस्कृती आणि परंपरा जपताना बुरसटलेल्या आणि कालबाह्य संकल्पना खोडून काढत आदर्श आणि विकसित भारताची संकल्पना नव्या पिढीमध्ये रूजवायची आहे. त्यासाठीच पंच प्रण प्रतिज्ञा नागरिकांनी घेणे अपेक्षित आहे. पंच प्रण यातील नागरिकांचे कर्तव्य हादेखील महत्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या अभियानाच्या निमित्ताने देशभक्तीची ज्योत कायम प्रज्ज्वलित राहील, तसेच वीरांच्या बलिदानाचा इतिहास हा पुढील पिढीपर्यंत पोहचेल, यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. नव्या पिढीला शहिदांचे योगदान, ज्यांनी देशाचा गौरव वाढवला, अशा मागील पिढीची जाणीव करून देणे आवश्यक आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल आणि इतर अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
तत्पूर्वी मान्यवरांनी मैदानातील स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर ‘शिलाफलकम’चे अनावरण करण्यात आले. या फलकावर स्वातंत्र्यवीरांची, शहिदांची नावे कोरण्यात आली आहेत. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या आप्तांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवर, उपस्थित नागरिकांनी हातात माती घेवून पंच प्रण प्रतिज्ञा घेतली. मान्यवरांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानात प्रातिनिधीक स्वरुपात वसुधा वंदन उपक्रम अंतर्गत रोपटे रुजविण्यात आले. यासह ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तुजतनाच्या विविध विकास कामांचे लोकार्पणही या कार्यक्रमात झाले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेतातील २४ वॉर्डमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियान अंतर्गत 9 ते 14 ऑगस्टदरम्यान पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन करण्यात येणार आहे. तसेच शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे अशा तीन ठिकाणी 75 स्थानिक प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करुन अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. याशिवाय वार्डस्तरावर ‘वीरांना वंदन’ करण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विभाग कार्यालय, शाळा, कार्यालये इत्यादी ठिकाणी दिनांक 9 ते 14 या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविणे व राष्ट्रगीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. माटी यात्रासाठी प्रत्येक प्रभागातून आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून तो कलश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. हा कलश जिल्हाधिकारी यांचेकडून दिनांक 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य समारोहासाठी रवाना करण्यात येणार आहे. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज फडकविला जाणार आहे.
(Source: PIB)