कोल्हापूर, ता. 17 : वारणानगर येथे बुधवारी (दि. 24) होत असलेल्या रयत संघटनेच्या ऊस परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे, या ऊस परिषदेत शेतकऱ्यांबाबत शासन कोणता निर्णय घेणार याकडे लोकांचे आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. रयत संघटनेची ऊस परिषद झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शनिवारी (दि. 27) खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होणार आहे. त्यामुळे, यावर्षी गळीत हंगामामध्ये या दोन्ही ऊस परिषदेतून शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खासदार राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17 वी ऊस परिषद घेण्यासाठी गावोगाव फिरत आहेत. ऊस शेतीबद्दलच्या अडचणी, समस्या आणि पर्याय ऐकूण घेत आहेत. जयसिंगपूर येथे होणारी ऊस परिषद सक्षमपणे झाली पाहिजे, अशी भूमिका घेवून श्री शेट्टी गावागावात शेतकरी सभा घेत आहेत. तर, कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे होणारी ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण दिले आहे. त्यामुळे ऊस दराबाबत राज्याचे लक्ष कोल्हापूरकडे लागले आहे. यावर्षी उसाचे बंपर पिक येईल असा अंदाज आहे. तरीही, 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमुळे पश्चिम महाराष्ट्रात उसाला चांगला भाव मिळणार हे स्पष्ट होत आहे.