नवी दिल्ली : इजिप्तने ५५,००० टन भारतीय गव्हाच्या पहिल्या खेपेस मंजुरी दिली आहे. इजिप्तच्या अलेक्झेंड्रिया बंदरात पोहोचलेल्या पहिल्या खेपेतील गव्हाची तपासणी केली आहे. निकषानुसार हा गहू योग्य असल्याचे आढळल्यानंतर त्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. इजिप्तने भारताकडून पाठवलेल्या गव्हाच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या गव्हाच्या प्रतवारीबाबत वाद निर्माण झाला आहे. अलिकडेच तुर्कस्तानने या गव्हात रुबेला व्हायरस आढळल्याचा आरोप करत गहू परत पावला होता.
याबाबत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार द हिंदू बिझनेस लाइनने एका निर्यातदाराच्या हवाल्याने सांगितले की, गहू विक्रीसाठी इजिप्तची बाजारपेठ ही खूप कठिण मानली जाते. जशा तऱ्हेने इजिप्तने भारतीय गहू स्वीकार केला आहे, ते पाहता तुर्कस्तानला हा मोठा झटका आहे. दोन आठवड्यापूर्वी तुर्कस्तानात गहू परत पाठविण्यात आला होता. निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार इजिप्तला गहू निर्यातीची दारे आता खुली होतील. भारताने १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लादले. मात्र ही डील या निर्बंधांपूर्वी झाली होती.