नवी दिल्ली : 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत, देशाने इथेनॉल मिश्रणाचा 11.20% टप्पा गाठला आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेल्या इथेनॉल पुरवठा हंगामात मोलॅसेस-आधारित डिस्टिलरीजमधून इथेनॉल पुरवठ्यासाठीच्या कोट्यात बदल करण्यात आलेला आहे. प्रारंभीच्या 270 कोटी लिटरच्या कोट्यात कपात करून आता 162 कोटी लिटरचा कोटा देण्यात आला आहे. मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजनी 123.52 कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी करार पूर्ण केले आहेत, तर तेल विपणन कंपन्यांना (OMCs) आतापर्यंत 76.97 कोटी लिटरचा पुरवठा करण्यात आला आहे.
मोलॅसीस-आधारित डिस्टिलरींजना बी हेवी मोलॅसेसमधून इथेनॉलसाठी सुधारित कोटा 115 कोटी लिटर देण्यात आला आहे, जो पूर्वी 130 कोटी लिटर होता. त्यासाठी एकूण करार 73.93 कोटी लिटरचे करार करण्यात आले आहेत तर प्रत्यक्ष ३४.४५ कोटी लिटर पुरवठा करण्यात आलेला आहे. उसाच्या रसापासून उत्पादित (SCJ) इथेनॉलसाठी सुधारित वाटप 43 कोटी लिटर आहे, जे 136 कोटी लिटरच्या सुरुवातीच्या कोट्यापेक्षा खूपच कमी आहे. SCJ कडून एकूण 44.7 कोटी लीटरचे करार करण्यात आले आहेत. त्यापैकी 41.17 कोटी लीटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. सी हेवी मोलॅसेसमधून इथेनॉल पुरवठ्याच्या वाटपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचा पुरवठा 1.35 कोटी लिटरपर्यंत पोहोचला असून 4 कोटी लिटर अद्याप शिल्लक आहे.
धान्य-आधारित इथेनॉल डिस्टिलरीजसाठीच्या कोट्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यांच्यासाठी 292 कोटी लिटर कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. यापैकी, करार केलेले प्रमाण 146.23 कोटी लिटर आहे आणि आतापर्यंत 45 कोटी लिटर पुरवठा झाला आहे. खराब धान्य (DFG) पासून इथेनॉलचा पुरवठा 25.66 कोटी लिटर आहे, तर करार 84.92 कोटी लिटरचे आहेत. केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी धोरणात्मक सहाय्य दिले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मक्यापासून उत्पादित इथेनॉलचा पुरवठा 19.34 कोटी लिटर झाला आहे तर एकूण करार केलेले प्रमाण 45.97 कोटी लिटर आहे. एकूणच, मोलॅसेस-आधारित आणि धान्य-आधारित डिस्टिलरीजमधून इथेनॉलचा 121.97 कोटी लिटर पुरवठा करण्यात आलेला आहे. एकूण करार 269.75 कोटी लिटरचे करण्यात आलेले आहेत.