नवी दिल्ली : शेतकऱ्यांना खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. आता रब्बी हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पिक कापणीच्या स्थितीत आहे, अशांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. ज्यांचे पीक पक्व अवस्थेत होते, अशांनाही नुकसान सोसावे लागले. मात्र, आता एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. विविध राज्यांत गव्हाची खरेदी सुरू झाली आहे. गहू खरेदीची वाढती आकडेवारी पाहून केंद्र सरकारचे अधिकारी खुश आहेत.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) गहू खरेदीची माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, एफसीआयचे सीएमडी अशोक मीणा यांनी सांगितले की, गहू खरेदीबाबत कोणीही चिंता करू नये. केंद्र सरकारकडे गव्हाचा पुरेसा साठा आहे. एफसीआयने आतापर्यंत ७ लाख मेट्रिक टनाची खरेदी केली आहे. हा एक उच्चांक आहे. गेल्या सहा वर्षात एप्रिलच्या सुरुवातीला २ लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला होता.
यावर्षी एफसीआयने ३४२ लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. एक एप्रिलपर्यंत सरकारकडे ८४ लाख मेट्रिक टन गहू होता. पुरेसा गहू असल्याने आट्याच्या किमती वाढणार नाहीत, असा दावा सरकारने केला आहे. देशात गव्हाचा खप अधिक आहे. त्यामुळे सरकारी साठा सहा वर्षांच्या निच्चांकी स्तरावर आहे. एक एप्रिलअखेर एकूण साठा ८५.१ लाख टन होता. हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी साठा आहे.