पुणे : विविध साखर कारखान्यांची ऊस गाळप क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भीमाशंकर साखर कारखान्याची सुद्धा गाळप क्षमता भविष्यात वाढविण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी उसाचे उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचे मत माजी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी सेवक आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचे अभिनंदन करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, भीमाशंकर साखर कारखाना शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहे. कारखान्याचा वीज, इथेनॉल प्रकल्प सुरू झाला आहे. त्यातून उत्पादन वाढले आहे. मात्र, प्रकल्प सुरू करण्यासाठी १२७ कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्याच्या व्याजाचा खर्च वाढला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, मंचर बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब खालकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे यांच्यासह संचालक, कारखान्याचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.