लखनऊ: उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) अहवालानुसार, राज्यात अद्याप चार साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी ११०.१६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत साखर कारखान्यांनी केलेल्या १२५.४६ लाख टनाच्या तुलनेत हे उत्पादन १५.३० लाख टनाने कमी आहे. यावर्षी हंगामात सहभाग घेतलेल्या १२० पैकी ११६ कारखान्यांनी आपले गाळप पूर्ण केले आहे. फक्त चार कारखान्यांचे गाळप सुरू आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १४ कारखाने गाळप करीत होते.
राज्याच्या पश्चिम विभागात सद्यस्थितीत गाळप हंगाम काही दिवस लांबला आहे. बहुतांश गूळ उत्पादक, खांडसरी युनीटनी लॉकडाउनमुळे लागू झालेल्या निर्बंधांनंतर आपले कामकाज थांबवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस साखर कारखान्यांना पाठवावा लागला आहे.