पुणे : चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांनी गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. चालू हंगाात सोलापूर विभागाने सर्वप्रथम आपले गाळप पूर्ण केले. आता कोल्हापूर विभागातील कारखान्यांनीही गाळप सत्र समाप्त केले आहे.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १५ एप्रिल २०२१ पर्यंत १८८ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९९३.७४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर एकूण १९४१.५४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.
राज्यात आतापर्यंत १४० साखर कारखाने बंद झाले आहेत. सर्वाधिक सोलापूर विभागात १५ एप्रिलअखेर ४३ कारखान्यांचे गाळप बंद झाले. यासोबतच कोल्हापूर विभागातील गाळप हंगामही संपला आहे. कोल्हापूर विभागात यावेळी ३७ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. सर्व कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. कोल्हापूर विभागात २३०.९१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. २७७.२५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा साखर उतारा १२.०१ टक्के इतका आहे.