कोल्हापूर : गेल्या हंगामात पुरवठा केलेल्या उसाचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. साखर कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता प्रती टन १०० रुपये आणि ५० रुपये दोन महिन्यांत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही एकाही कारखान्याने हा हप्ता दिलेला नाही. तातडीने हे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत, अशी मागणी संघटनेने यावेळी केली.
‘आंदोलन अंकुश’चे जिल्हाध्यक्ष धनाजी चुडमुंगे म्हणाले की, साखर कारखानदारांनी आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत दुसरा हप्ता देण्याची तयारी दर्शवली. त्याविषयी संमती पत्रे दिली आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील एकाही कारखान्याने हे पैसे दिलेले नाहीत. तरी हा दुसरा हप्ता तत्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ठरल्यानुसार पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात बाळकृष्ण सांगावे, बंडू होगले, आप्पा कदम, मलगोंडा चौगुले यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.