कोल्हापूर : भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, बेकरी उत्पादने, शीतपेय आदींद्वारे व्यावसायिक उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेची किंमत 42 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढवण्याची मागणी साखर उद्योगाने केंद्र सरकारकडे केली आहे. साखर उद्योगाने म्हटले आहे कि, गेल्या पाच वर्षापासून साखरेचा किमान विक्री दर 32 रुपये प्रतिकिलो इतका स्थिर आहे. मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपीमध्ये मात्र गेल्या पाच वर्षात पाच वेळा वाढ झाली आहे. MSP कमी आणि FRP जास्त यामुळे साखर कारखानदारांना आर्थिकदृष्ट्या तारेवरची कसरत करावी लागत आहे.
देशातील एकूण साखरेच्या उत्पादनातील तब्बल 75% साखरेचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो, तर उर्वरित साखर सर्वसामान्य ग्राहकांकडून वापरली जाते. त्यामुळे साखरेच्या वापरानुसार त्याची किमत वेगवेगळी ठेवली आणि व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात वाढ केल्यास त्याचा फायदा देशातील कोट्यावधी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला होऊ शकतो. खासदार महाडिक म्हणाले की, मिठाई, मसाले आणि शीतपेय बनविण्यासाठी विकल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात वाढ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. बगॅसपासून तयार होणाऱ्या विजेवर प्रति युनिट 1 रुपये अनुदान देण्याची मागणी केल्याचेही महाडिक यांनी सांगितले.
‘चिनीमंडी’शी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, 2019 पासून साखरेच्या MSP मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, मात्र FRP मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने साखर कारखानदारांना बँकांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे देशातील अनेक कारखान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशास्थितीत घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवले तर शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि साखर उद्योगाला त्याचा फायदा होईल.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.