कर्नलगंज : गोंडाचे जिल्हाधिकारी डॉ. उज्ज्वल कुमार यांनी बलरामपूर युनिटच्या मैजापूर साखर कारखान्याची अचानक पाहणी केली. मैजापूर साखर कारखान्यात पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. साखर कारखान्यातील प्लांटमध्ये उभारण्यात येत असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या इथेनॉल प्लांटची पाहणी केली. त्याच्या उभारणीच्या कामाचा आढावा घेतला.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उसाचे वजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून बिलिंग व्यवस्थेपर्यंतच्या सर्व घटकांशी चर्चा केली. इथेनॉल प्लांटमध्ये सुरू असलेल्या कामाकाजाचे निरीक्षण केले. रस्ते सुरक्षेबाबत कार्यशाळा आयोजित करून जागरुक शेतकऱ्यांचा सन्मान केला. कार्यशाळेत रस्ता सुरक्षेबाबतच्या नियमांचा आढावा घेताना वाहने सावधानतेने चालवण्याविषयी आवाहन केले. कडाक्याची थंडी आणि दाट धुके असल्याने सुरक्षितता बाळगावी असे आवाहन केले. निवडक शेतकऱ्यांचा हेल्मेट देवून सत्कार करण्यात आला. नियमांचे पालन करून अपघात रोखण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.