पैनगंगा सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न कागदावरच !

नांदेड : किनवट परिसरातील ऊस उत्पादकांना गेल्या ३० वर्षांपासून विदर्भातील कारखान्यावर हेलपाटे मारावे लागत आहेत. इतक्या वर्षांतही साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. परिसराला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी दाखविलेले पैनगंगा सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न कागदावरच राहिले आहे. किनवट मतदारसंघातील शेती सुधारावी येथील शेतकऱ्यांनी नगदी पीक घ्यावे, या उद्देशाने काही वर्षांपूर्वी साखर कारखाना उभारणीची योजना आखण्यात आली. मात्र शासन दरबारी वजन कमी पडल्याने अजूनपर्यंत येथे साखर कारखाना सुरू झाला नाही.

तत्कालीन खासदार दिवंगत उत्तमराव राठोड यांनी उनकेश्वर शिवारात सहकारी तत्त्वावर पैनगंगा साखर कारखाना उभारणीची मुहूर्तमेढ रोवली होती. यासाठी शेतकऱ्यांनी भाग भांडवल जमा केले. शेअर्स उभे करण्याचे कामही चालू केले. मात्र, नंतर सत्ता परिवर्तन झाले. यांदरम्यान दिवंगत खासदार उत्तमराव राठोड यांनी कारखान्याची सूत्रे तत्कालीन आमदार तथा माजी मंत्री डी. बी. पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. तरीही पुढे काहीही झाले नाही. या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मंगरूळ येथील कारखान्याला उसाची विक्री करतात. किनवट तालुक्यात कारखाना झाला तर उसाचे क्षेत्र वाढू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here